स्व. सुधाकरपंतांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामीण भागात नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन : प्रणव परिचारक
कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजपासून नेत्रतपासणी व लेन्स टाकून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्याचा जागर करून सर्वार्थाने स्वर्गीय सुधाकरपंत यांना अभिवादन करण्यासाठी ग्रामीण भागात नऊ ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पांडुरंग परिवार युवक आघाडी व युवा मंच यांच्या वतीने प्रणव परिचारक यांनी दिली.
कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे 17 ऑगस्ट रोजी प्रथम पुण्यस्मरण होत आहे. या पार्श्वभूमीवर आ. प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिचारक युवा मंच यांच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे व एका ग्रामीण रुग्णालयात नागरिकांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या निमित्ताने नागरिकांची नेत्रतपासणी तसेच लेन्स टाकून मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तपासण्या देखील मोफत केल्या जातील. यानिमित्ताने महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोग आजाराविषयीची तपासणी देखील होणार आहे.
पंढरपुरात होणाऱ्या आरोग्य शिबिराची सुरुवात बुधवारी 11 ऑगस्ट रोजी गादेगाव येथे होईल. तर 12 ऑगस्ट रोजी खर्डी , 14 ऑगस्ट रोजी रोपळे , 16 ऑगस्ट रोजी भाळवणी ,18 ऑगस्ट रोजी करकंब , 19 ऑगस्ट रोजी उंबरे पागे , 20 ऑगस्ट रोजी तुंगत , 21 ऑगस्ट रोजी पुळुज तर या संपूर्ण शिबीराचा समारोप कासेगाव येथे 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. ही सर्व शिबिरे सकाळी 9 वाजलेपासून 1 वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात होतील. तर करकंबचे शिबिर ग्रामीण रुग्णालयात होणार आहे. या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णांनी कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून सहभागी व्हावे असेही आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.
कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये समाजाला सत्कर्माची दृष्टी देण्याचे काम केले. हा त्यांच्या विचारांचा वारसा आ. प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या पिढीने अंगीकारून या नेत्ररोग तपासणी शिबिराच्या माध्यमातून लोकांना खरीखुरी दृष्टी द्यायचे काम कळे पाहीजे. या विचारातून पंढरपूर तालुक्यात नऊ ठिकाणी नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. तर शहरात देखील लवकरच आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू आहे. असेही या निमित्ताने परिचारक यांनी सांगितले.