दादामहाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी)
येथील वै. विद्यावाचस्पती डॉ. दादा महाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा नुकताच झाला. येथील भगवानराव मनमाडकर यांच्यावतीने एकदिवसीय नामसंकिर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
वारकरी संप्रदायातील अभ्यासू संत म्हणून विद्यावाचस्पती डॉ. कै.दादा महाराज मनमाडकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा नुकताच सोमवारी संपन्न झाला. यानिमित्ताने परंपरेप्रमाणे ह.भ.प. महादेव महाराज आडसुळ आणि ह.भ.प. निरंजन महाराज मनमाडकर यांच्या प्रवचनानंतर महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यापूर्वी सुदर्शन कुंभार , शिवांजली आदलिंगे आणि शुभांगीताई मनमाडकर यांची भजन सेवा झाली. वै. दादामहाराज मनमाडकर यांचे असंख्य भक्तगण यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी करून आशीर्वाद घेतले.
यानिमित्ताने आमदार प्रशांत परिचारक , प्रणव परिचारक , रोहन परिचारक , प्रणितीताई भालके , मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदीसह वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळींसह मान्यवरांनी येऊन दादा महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यानिमित्ताने महाराजांचे पंढरपूरसह आसपासच्या पंचक्रोशीतील तसेच परगावचेही भक्तगण उपस्थित होते. मनमाडकर कुटुंबीयांच्या वतीने दादा महाराज यांचे बंधू भगवानराव मनमाडकर आणि पुतणे धनंजय मनमाडकर यांच्या वतीने सर्वांना महाप्रसाद देण्यात आला.
दादा महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी कोरोनामुळे हरिनाम सप्ताह न करता. साधेपणाने कोरोना विषयक शासनाचे सर्व नियम पाळून हरिनामाच्या जयघोषात व दादा महाराजांचे स्मरण करून पुण्यस्मरणाचा सोहळा संपन्न झाला.