इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत अल्प व्याजदराने कर्ज देण्यात येते. बीज भांडवल आणि थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही.एन. मोहोरकर यांनी केले आहे.
यंदाच्या 2021-22 या वित्तीय वर्षासाठी 20 टक्के बीज भांडवल योजना आणि थेट कर्ज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. बीज भांडवल योजनेमध्ये कर्ज मर्यादा 2.5 लाख ते पाच लाख रूपयांपर्यंत असून यामध्ये बँकेचा सहभाग 75 टक्के, महामंडळाचा सहभाग 20 टक्के तर लाभार्थीचा सहभाग 5 टक्के आहे.
थेट कर्ज योजनेमध्ये महामंडळाकडून कर्ज मर्यादा एक लाख रूपयांपर्यंत आहे. दोन्ही कर्ज योजनांचा अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. अर्ज घेण्यासाठी स्वत: लाभार्थी उपस्थित असणे आवश्यक असून सोबत जातीचा दाखला व आधारकार्ड मूळ प्रत सोबत असणे बंधनकारक आहे.
महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 10 लाख रूपयांपर्यंत आणि गट कर्ज व्याज परतावा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनांची अधिक माहिती महामंडळाचे संकेतस्थळ www.msobcfdc.org वर उपलब्ध आहे. ही योजना ऑनलाईन स्वरुपात आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0217-2312595, ईमेल-dmobcsolapur@gmail.com डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला, बिग बझार समोर, उपलप मंगल कार्यालय शेजारी, सात रस्ता सोलापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन श्री. मोहोरकर यांनी केले आहे.