आषाढी यात्रेदरम्यान पंढरपूर व परिसरातील गावांमध्ये फक्त तीन दिवसीय संचारबंदी करणेची मागणी…
आ.परिचारक व आ.आवताडे यांनी एकत्रितरित्या लेखी पत्राव्दारे केली मागणी
आषाढी यात्रे दरम्यान पंढरपूर शहर व परिसरात शासनामार्फत करणेत आलेली नऊ दिवसांची संचारबंदी कमी करून तीन दिवसांची म्हणजेच दि.19 जुलै ते 21 जुलै 2021 दरम्यान जाहीर करावी यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवारसाहेब यांची भेट घेवून लेखीपत्राव्दारे विधानपरिषदेचे जिल्हयाचे आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा आमदार समाधान आवताडे यांनी एकत्रितरित्या मागणी केली.
कोविड 19 च्या पार्श्वगभूमीवर होणारा आषाढी एकादशी सोहळा-2021 वर प्रतिबंध घालताना जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व परिसरातील नऊ गावांमध्ये दि.17 जुलै ते 21 जुलै 2021 दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाबतीत संचारबंदी जाहीर केली आहे. यामुळे पंढरपूरातील सामान्य नागरीक मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे.
वास्तविक, पंढरपूरात येणाऱ्या सर्वच मार्गावर त्रिस्तरीय नाकाबंदी करून सुमारे तीन हजार पोलीसांमार्फत बंदोबस्त करणेचे नियोजन शासनामार्फत केले आहे. तसेच एसटी महामंडळाच्या बसेसही या काळात बंद ठेवणेत आलेल्या आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर व परिसरात खाजगी वाहने अथवा बसने भाविक येण्याची शक्यताच नाही.
तीर्थक्षेत्र पंढरपूर हे चार यात्रांवर जगणारे गाव आहे. मागील दिड वर्षापासून सततची संचारबंदी व वर्षभरातील यात्रा रद्द झालेमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुन्हा एकदा शासनाने आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरात येणेसाठी चौफेर नाकाबंदी असताना पंढरपूर शहर व परिसरातील गावामध्ये संचारबंदी करणेचे निर्देश काढणे हे येथील अर्थकारणासाठी अयोग्य आहे. त्यामुळे सुरळीत होत चाललेली आर्थिक परिस्थिती पुन्हा विस्कळीत होणेची चिन्हे निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत याचा फटका लहान मोठा व्यापारी वर्ग, कष्टकरी मजूर, हारफुले विक्रेते, प्रासादिक भांडार, रिक्षा-टांगावाले, गोरगरीब मजूर, भाजी विक्रेते शेतकरी या सामान्य जनतेला बसणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब यांनी आषाढी यात्रा काळातील संचारबंदी शिथील करणेबाबत सकारात्मक निर्णय घेवू असे आ.परिचारक व आ.आवताडे यांना आश्वासित केले.