शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या मागण्यांवर तात्काळ कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश
पंढरपूर –
सोलापूर जिल्ह्यातील तालुका व ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व रूग्णालयांबाहेर (सरकारी व खाजगी) दरपत्रक लावण्यात यावेत व जिल्हा सनियंत्रण समितीची स्थापना करावी व महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत यापूर्वी कोरोनावर खाजगी रूग्णालयात उपचार घेतलेल्या रूग्णांना त्यांचे पैसे परत मिळणेबाबत व म्युकरमायकोसिस रूग्णांना सर्व रूग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार देण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांना शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबाळी यांनी सोलापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात दिले. यावेळी पालकमंत्री यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या मागण्या रास्त असून गोरगरीबांना दिलासा देण्यासाठी आपण तात्काळ कारवाई करावी असे आदेश दिलेले आहेत. यानंतर सदरच्या निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना ही दिलेली आहे.
यापूर्वी शहीद टिपू सुलतान युवक संघटना यांच्यावतीने पंढरपूर तालुक्यातील अनेक रूग्णांलयातील बिलांची तपासणी करण्याची मागणी केली होती त्यानंतर पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सुमारे 500 रूग्णांची बिले तपासून त्या रूग्णांचे जादा घेण्यात आलेले पैसे परत दिलेले आहेत. यानंतर आता संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व रूग्णालयांमध्ये सुरू असलेल्या प्रकाराची माहिती पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे सांगितलेली आहे. त्यानंतर पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना तात्काळ आदेश दिलेला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तालुका व ग्रामीण भागातील गोरगरीब रूग्णांना याचा चांगला दिलासा मिळणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील रूग्णांची लूट करणाऱ्या खाजगी रूग्णांना चाप बसणार आहे