सोलापूर सोशल फाउंडेशनच्या बैठकीत निर्णय
सोलापूर सोशल फाऊंडेशन संचालक समितीची नियोजित बैठक आज पार पडली. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. सुभाषबापू देशमुख, संचालक अभिजित पाटील, रवींद्र मिनीयार, मयुरी वाघमारे, मुख्य समन्वयक विजय पाटील, विपुल लावंड, रोहिणी बिडवे, विजय कुचेकर, पल्लवी माने व अन्य सभासदांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली. मागील मिटिंगचा आढावा घेत या सत्राचा प्रारंभ झाला.
फाऊंडेशनला ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा यानंतर घेण्यात आला. फेसबुक पेज वरील फेसबुक लाइव्ह व्याख्यानमाला, सोलापूर जिल्ह्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या निबंध व फोटोग्राफी स्पर्धेचे सुरू असणारे परीक्षण अशा बाबींचा यात समावेश होता.
यानंतर ज्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, त्यापैकी काही प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे –
◆ सोलापूर जिल्ह्यातील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी फाऊंडेशनतर्फे नोंदणी करण्यात आलेल्या स्वतंत्र कंपनीच्या पुढील कामकाजाची दिशा ठरवणे.
◆ सोलापूर जिल्ह्यातील कलाकारांच्या कलेला वाव मिळावा व त्यांनी केलेल्या कार्याला व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी श्री. प्रशांत वेदक यांच्या पुढाकारातून व संस्थेच्या माध्यमातून नियोजन करणे.
◆ पुढच्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मा. राहुल सोलापूरकर यांच्या नेतृत्वात अमृतमोहोत्सव वर्ष निमित्ताने विविध कार्यक्रम चे आयोजन करणे.
◆ वैष्णवी देवी ट्रस्ट, सोलापूर येथे लॉकडाऊन काळात लोकसहभागातून अन्नदान उपक्रम बाबत माहिती सादर करण्यात आली व पुढील नियोजनवर चर्चा करण्यात आली.
◆ नवीन व्यवसायिक तयार करणे, तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना मदत करणे.
◆ ‘भंडीशेगाव एक समृद्ध गाव’ हे उद्देश ठेवून काम सुरु असून हे गाव सोलापूर जिल्ह्यातील एक आदर्श गाव म्हणून उदयास यावे यासाठी पुढील नियोजनाचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून संस्थे तर्फे सर्व सहकार्य करण्याबाबत चर्चा करणे.
कोरोना काळात फाऊंडेशनचे कार्य व समितीच्या मिटिंग्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन उठवल्यानंतर प्रत्यक्ष उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत कोरोना सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन करण्यात आले. काळ बिकट असला तरीही नागरिकांना साहाय्य व सोलापूरचा विकास यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन सदैव सज्ज आहे!