कोविड रूग्णालयात शासकीय दरपत्रक सक्तीने लावून घ्या

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले आहे. लहान मुलांचा एचबी कमी असल्यास त्यांना अधिक संसर्ग होण्याची भीती असल्याने जिल्ह्यातील 18 वर्षे वयाखालील सर्व मुलांची हिमोग्लोबिन तपासणी करणार असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले.
नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
श्री. भरणे म्हणाले, कोरोनाचा लहान मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी सतर्क रहावे. पालकांनाही काळजी घेण्याच्या सूचना द्याव्यात. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात 0 ते 18 वयोगटातील बालके 11 लाख 92 हजार एवढी असून लहान मुलांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 40 बेडची सोय करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 13 लहान मुलांचे दवाखाने अधिग्रहित करण्यात आले असून यामध्ये 240 बेडची तात्पुरती सोय केली आहे. सोलापूर शहरात 16 दवाखाने अधिग्रहित करून यामध्ये 409 बेडची सोय करण्यात आली आहे. पालकांनी घाबरून न जाता मुलांचा आहार, स्वच्छता याकडे लक्ष द्यावे. सुविधायुक्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ऑक्सिजनचे बेड देऊन कोरोनाग्रस्त लहान मुलांची सोय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात म्युकर मायकोसिसच्या रूग्णाबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना देताना श्री. भरणे म्हणाले, रूग्णांना अम्फोटिसिरीन-बी इंजेक्शनची कमतरता पडू देऊ नका. शासनाकडे जादा मागणी नोंदवून रूग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत योग्य नियोजन करा. जिल्ह्यात 132 म्युकर मायकोसिस रूग्णांपैकी 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 120 रूग्ण उपचार घेत असून 30 रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. यामध्ये चार रूग्ण कोविड असून बाकीचे नॉन कोविड आहेत. यामुळे नागरिकांनी कोविड झाल्यानंतरही काळजी घेण्याची गरज आहे. या रूग्णांकरिता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार घेता येणार आहेत, या योजनेच्या रूग्णालयांची बैठक घेऊन त्यांच्या शंका दूर कराव्या.
ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणेने पेट्रोलिंग, कारवाया वाढविल्या पाहिजेत. पोलिसांना साखर कारखाने, बाजार समित्या यांची वाहने उपलब्ध करून द्याव्यात. उपप्रादेशिक परिवहन विभागाने अतिरिक्त माल भरणारी जड वाहतूक तपासणीसाठी नाके वाढवावेत. वाढीव बिलांच्या अजूनही नागरिकांच्या तक्रारी येत असून डॉक्टरांनी सामाजिक जाणिवेतून काम करावे. नातेवाईकांनी डॉक्टरांकडून पक्के बील घ्यावे. रूग्णालयांनी शासकीय दरपत्रक सक्तीने लावून घ्यावे. सलमान खान यांच्या बिईंग ह्युमन संस्थेने 25 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर दिली असून जिल्ह्यातील आणि बाहेरील सामाजिक संस्था, उद्योग यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मिळविण्याचा प्रयत्न करा, अशा सूचनाही श्री. भरणे यांनी केल्या.
जिल्ह्यात 15871 रूग्ण उपचार घेत असून जिल्ह्याचा मृत्यूदर, रूग्णसंख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करा. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर, शिल्लक बेड, कोणत्या ठिकाणी रूग्ण आहेत, याचीही माहिती श्री. भरणे यांनी घेऊन सूचना केल्या.
लसीकरणाबाबत सर्वांनी सतर्क राहून काम करावे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होईल, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
आतापर्यंत जिल्ह्याला चार लाख 98 हजार 510 डोस प्राप्त झाले. यामध्ये 16 हजार 580 कोव्हॅक्सिन आणि चार लाख 81 हजार 930 कोविशिल्डची लस मिळाली आहे. हेल्थ केअर वर्कर पहिला डोस 100 टक्के झाला असून फ्रंट लाईनरसाठी 39894 डोस दिले. 45वर्षांवरील एक लाख 44 हजार 576, 60 वर्षांवरील एक लाख 43 हजार 345, 18 ते 44 वर्षांखालील 16 हजार 177 जणांना पहिल्या डोसचे लसीकरण केले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या 52 टीम आहेत. या टीममधील डॉक्टरांद्वारे गावोगावी लहान मुलांची तपासणी करण्यात येणार आहे.
श्री. स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांची बैठक घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. लहान मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काढा, औषधे देण्यात येणार आहेत. त्यांच्या रक्ताची तपासणी करण्याचेही नियोजन केले आहे.
श्रीमती सातपुते यांनी सांगितले की, पोलीस यंत्रणेद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पेट्रोलिंग करण्यात येणार असून संस्थात्मक विलगीकरण, संसर्ग वाढविणाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे.
डॉ. जाधव यांनी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती मांडली तर डॉ. ढेले यांनी म्युकर मायकोसिसवर आतापर्यंत 349 इंजेक्शन प्राप्त झाल्याचे सांगितले. हे इंजेक्शनचा वापर मार्गदर्शक सूचनाप्रमाणे शासकीय रूग्णालयात लागतील तेवढे ठेवून बाकीचे खाजगी दवाखान्यांना वाटप करण्यात येत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago