आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा नूतन आमदार समाधान आवताडे यांच्या समवेत प्रशासनाची बैठक घेवून कोरोना रूग्णांसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने वाढत असून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात याची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे विजया नंतर हारतुरे, सत्कार हे स्वीकारण्यापेक्षा समाधान आवताडे यांनी प्रशांत परिचारक यांच्यासह प्रांताधिकारी कार्यालयात यावर उपाययोजना बाबत तातडीची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी सूचना केली.
दरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी, शहरातील ज्या प्रभागात व ग्रामीण भागात ज्या परिसरात अधिक रूग्ण आढळत आहेत. त्या भागात अधिकाधिक कोरोना टेस्ट कराव्यात अशी सूचना केली. अशा भागात मोठ्या प्रमाणात कॅम्प घेणे गरजेचे आहे. यावर अधिकार्यांनी शासनाकडून कोरोना टेस्ट किटचा तुटवडा असल्याचे सांगताच यासाठी खासगी कंपनीकडून ते खरेदी करण्याची तयारी दर्शवली. यासाठी आम्ही वैयक्तिक मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच मनुष्य बळ कमी पडत असेल तर सामाजिक संस्था, संघटना व खासगी स्वयंसेवकांची मदत घेण्याबाबत तयारी दर्शवली. प्रशासनाने पंढरपूर शहर व तालुक्यात तीन हजार रूग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटर सुरू करावे, प्रशासनास याबाबत मर्याद येत असेल तर खासगी डॉक्टरांना कमी दरात असे सेंटर सुरू करण्याची तातडीने परवानी द्यावी आदी सूचना मांडल्या. यासह आमदार परिचारक यांनी, रेमडेसिवीर व ऑक्सिजनच्या तुडवड्यावर देखील चिंता व्यक्त केली.
लसीकरण वाढविणे गरजेचे असून कमी डोस मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. यासाठी येणार्या डोस पैकी ६० टक्के लस दुसर्यांदा डोस घेणार्यांसाठी राखीव ठेवाव्यात अशी महत्वाची सूचना मांडली.
कोरोनामुळे रूग्णालयात दाखल केल्यावर सर्वसामान्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यासाठी शासनाने महात्मा फुले आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रूग्णालयाच्या क्षमतेच्या ८० टक्के खाटा या योजनेसाठी राखीव ठेवण्याचा आदेश असताना अनेक रूग्णालयात या नियमाची अंमलबजावणी होत नाही. यासाठी प्रशासनाने याबाबत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अश्या सूचना आमदार प्रशांत परिचारक यांनी बैठकीत केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मा.श्री. विजयराज डोंगरे,माजी नगराध्यक्ष मा.श्री.लक्ष्मण पापरकर, उपविभागीय अधिकारी श्री.गजानन गुरव , नगरपालिकेचे मुख्याधिकारी मानोरकर ,गटविकास अधिकारी घोडके ,आरोग्य अधिकारी डॉ बोधले, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ गिराम आदी अधिकारी उपस्थित होते.