तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन, करकंब तालुका पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, रजनी देशमुख, सरपंच तेजमाला पांढरे, माजी सरपंच आदिनाथ देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, नायब तहसीलदार पंडीत कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना गावातच वेळेत उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असणाऱ्या गावात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील काही दिवस अधिक धोक्याचे आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करावेत.
करकंब येथील कोविड केअर सेंटर येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभा साखरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार सरवदे व आरोग्य कर्मचारी तसेच गावांतील खाजगी डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार आहेत.
ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी स्वच्छता करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक वैद्यकीय साहित्य व इतर गरजेची साधन सामग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने अधिकचे 50 बेडची उपलब्धता करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी यावेळी सांगितले.