भूवैकुंठ समजल्या जणाऱ्या पंढरपूरला जशी भक्तीची परंपरा आहे तसाच संघटीत गुंडगीरी आणि अवैध व्यवसायिकांच्या दहशतीचाही डाग आहे.आपले अवैध धंदे सुरळीत सुरु रहावेत म्हणून राजकीय वस्त्राची झूल पांघरत प्रतिष्ठा प्राप्त करणाऱ्यांची जशी इथे कमी नाही तशीच एखादा अतिशय कर्तव्यकठोर अधिकारी जर या शहरास लाभला तर त्याला देवत्व बहाल करण्यातही येथील जनतेने कधी कसूर ठेवली नाही.तात्कालीन पोलीस उपअधिक्षक विक्रम बोके,भूषणकुमार उपाध्याय,प्रशांत कदम,निखिल पिंगळे या अधिकाऱ्यांना पंढरपूरकरांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते आणि आजही त्यांचे नाव हृदयात जपले आहे.तर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतिशय कर्तव्यकठोर भूमिका घेत सामान्य जनतेला दिलासा तर दोन नंबरवाल्याना धडकी भरविणारे अनेक पोलीस निरीक्षक,सहा.पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी या शहराने अनुभवले आहेत.पण मधून अधून अशा काही घटना घडतात ज्यामुळे पंढरपूर शहरात नकारात्मक चर्चा होऊ लागते आणि असाच प्रकार परवाच्या लाचखोरी प्रकरणात आज अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी राजेंद्र गाडेकर प्रकरणामुळे होत आहे. एकटे दुकटे दिवसारात्री केव्हाही पेट्रोलींग करताना ”सामान्य” लोकांमध्ये प्रचंड ”दरारा” असलेले सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गाडेकर यास अटक झाल्याने आता हे लाचखोरीचे प्रकरण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. आणि आणखी कुठली नावे पुढे येतात हाही उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
गेल्या महिनाभरापासून पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जसे राजकीय वारे वाहू लागले तसाच पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताणही वाढला.मात्र याच काळात तालुका पोलीस ठाण्याने उपविभागात अवैध वाळू उपशावर सर्वाधिक करत वाळू चोरांवर वचक ठेवला,तर शहर परिसरातही काही छोट्यामोठ्या कारवाया होताना दिसून आल्या.पण वाळू उपसा करून दोन टिपर वाळू घेऊन येण्याच्या आरोपाखाली तलाठ्यासह इतर आरोपीवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो काय आणि रात्रीत या प्रकरणी काळी बाजू पुढे येते काय हे सारे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याची प्रतिमा मलीन करणारे ठरले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या फिर्यादीत मध्यस्त विशाल काटे आणि अन्य काही आरोपी असा उल्लेख करण्यात आला आणि यात नमूद करण्यात आलेला आरोप लक्षात घेतला तर या प्रकरणीं नक्कीच काही पोलीस कर्मचारी सामील असावेत अशी चर्चा झाली आणि आज शेवटी राजेंद्र गाडेकर अटक प्रकरणामुळे याची सुरुवात झाली आहे.
अटकेत असलेल्या गाडेकर आणी विशाल काटे यांच्याकडून पुढील २४ तासाच्या पोलीस कस्टडीत नक्की आणखी तपास कुठल्या दिशेने पुढे सरकतो,आणखी कुणाची नावे पुढे येतात ते पाहावे लागणार आहे.रस्त्यावरील छोटे मोठे व्यवसायिक,गल्लीत गप्पाटप्पा करणारे नागिरक विशेषतः युवावर्ग यांच्यात दरारा निर्माण करण्यात गाडेकरनी मोठे यश मिळवले होते,कदाचित कर्तव्य कठोर अधिकारी आहे म्हणून काही लोकांनी याचे कौतकही केले पण आता लाचखोरी प्रकरणी अटक झाल्यामुळे हेच का ? ते गाडेकर अशी चर्चाही होताना दिसून येत आहे.तर या प्रकरणाची दुसरी बाजूही पोलीस तपासात कदाचित पुढे येईल असा विश्वासही अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत
अर्थात लाचलुचपत विभागाकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात सपोनि राजेंद्र गाडेकर आणी विशाल काटे यास अटक झाली असली तरी हे प्रकरण अजून प्राथमिक स्तरावर आहे.या प्रकणाची सखोल चौकशी होताना काटे आणि गाडेकर यांच्या भेटीगाठी,मोबाईल संभाषण यासह अनेक पुरावे तपासले जातील आणि या प्रकणातील सत्य बाहेर येईलच,तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्याद दाखल करणारा आरोपीचा भाऊ,इतर आरोपी अथवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि विशाल काटे यांचे कॉलडिटेल्स आदी तपासात महत्वपूर्ण ठरतील अशीही शक्यता वर्तविली जात आहे. पण तो पर्यंत तरी या अटक प्रकरणामुळे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याची प्रतिमा मालिन झाली आहे.आणि साताऱ्याहून सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यानंतर तिकडल्या कामगिरीमुळे इकडे प्रचंड चर्चेत आलेल्या सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या नक्कीच या प्रकरणी कठोर पावले उचलतील अशी आशा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.