भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील असे पुरोगामीत्व स्विकारण्याची लाज वाटेल- प्रा. लक्ष्मण ढोबळे
पंढरपूर : भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील असे पुरोगामीत्व स्विकारण्याची लाज वाटेल अशी बाचरी टीका माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत बोलताना केली आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीतील प्रचाराला आता चांगलीच धार चढल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधता पहिल्यांदाच होणा-या पोटनिवडणुकीत अन्य पक्षातून भाजपात आलेल्या स्थानिक नेत्यानी चांगलेच जुन्या मैत्रीचे रंग उधळत जुने हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडीच्या विरोधात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहा सभा घेत धडका उडवल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वारू उधळला नसता तरच नवल! राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका करताना रेणू शर्मा प्रकरणाचा उल्लेख केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
भाजप नेते लक्ष्मण ढोबळे त्यांच्या खास मिश्कीली स्टाईलमध्ये रंगात आले होते ते म्हणाले की, माय बहीण करवली म्हणून आली. धनंजय मुंडे म्हणाले, वहिनी तुम्ही आलात म्हणजे ताटात सांडले काय आणि वाटीत सांडले काय सारखेच. दोघी बहिणी बहिणी एकत्र राहा. ढोबळे म्हणाले की, ‘मग एकदा वीज कनेक्शन घेतले की मीटर पडणारच. मीटर पडले. दोन पोर झाली. त्या दोन पोरांना मुंडेनी आपल नाव दिले. त्यांना विचारले, अरे तू नाव कसे दिलेस? तेव्हा ते म्हणाले, मला अजिबात भीती वाटत नाही. महाराष्ट्रातील माझा लाडका नेता पुरोगामी आहे. असे नवीन विषय पुरोगामीत्वाचे स्वीकारले पाहिजे. भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील असे पुरोगामीत्व स्विकारण्याची लाज वाटेल. पण धनंजय मुंडेंना लाज वाटली नाही, अशी घणाघाती टीका ढोबळे यांनी केली. ते पुढे म्हणाले की आमची चित्राताई वाघ वाघिणीसारखी हातात पायतण घेऊन उभी होती. नीट समजून घ्या, असेही ढोबळे म्हणाले. ढोबळे यांच्या प्रत्येक वाक्यावर उपस्थितांनी हशा आणि टाळ्यादेत दाद दिल्याने ढोबळे मास्तरांच्या शब्दांना धार चढली होती!